वेळ - ५.०७ (सा.)
वापी शटल
जनरल compartment
गाडी सुटायची वेळ, daily चे प्रवासी उड्या मारत येताहेत पण गाडी आधीच खच्चून भरलीये. शुक्रवार असल्याचा परिणाम असावा.
माझ्या बोगीत ४ गुजराथी बायका पसरल्यात. म्हणजे बसू शकल्या असत्या पण पसरूनच गेल्यात. एक नवविवाहित जोडपं बसलंय, कुणाच्या अध्यात न मध्यात. बाकीचे बसल्या जागी उडताहेत पण हे दोघे मात्र स्वर्गात पोचलेत. एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंब आहे, अगदी मध्यमवर्गीयांच्या गुणांसकट. हक्क मागायला न लाजणारे पण थोडीशी दडपशाही झाली कि लगेच दडपून जाणारे.
गाडी सुटायच्या आधी एक बाई / मुलगी आली. इकडे तिकडे पाहिलं आणि टुणकन उडी मारून वर चढून बसली. आता माझ्या मुंबई लोकलवाल्या डोक्याला झटकाच बसला. धावती लोकल पकडणं वेगळ आणि उडी मारून वर चढून जागा पटकावण वेगळ. आणि तेही under tremendous pressure ! कारण त्याच वेळी एक दुसरे काकाही तीच जागा पटकावण्याच्या हिशोबात होते.
अखेर कंटाळवाणा प्रवास सुरु झाला. बाजूला दोन छोट्या बहिणी बसल्या आहेत. पण त्यातली छोटी केव्हाच झोपली आणि दुसरी बिचारी आईच्या दडपशाहीचा (?) विरोध न करता बसली आहे. बालसुलभ औत्सुक्यापोटी माझं लिखाण वाचायचा प्रयत्न करतेय बहुतेक. पण माझं अक्षरच इतकं दिव्य आहे कि ते वाचता येणाऱ्या माणसाचा मी अतीव आदर करतो. अगदी शाळेत असल्यापासून आई, शिक्षक आणि मित्रांनी ( copy करण्यासाठी ) ते सुधारण्याचे पुरेपार प्रयत्न केले. पण माझं अक्षर सुधारणं म्हणजे बापरे! म्हणजे कधी तरी ते readable असू शकतं पण माझा हात त्या प्रकारे क्वचितच वळतो. आता जी गोष्ट हातातच नाही ती बोटात कुठून येणार?
वैतरणा स्टेशनच्या अलीकडे एक सिग्नल लागला आणि एवढे fuel tankers पाहिले कि भारत श्रीमंत झाल्याची दिवास्वप्न मला पडलं. हे स्टेशन एक खतरनाक आहे, आजूबाजूला दूर दूर पर्यंत वस्तीच दिसत नाही. लगेच खाडी लागते आणि मासेमारी करणाऱ्या बोटी दिसतात. आधी मस्त वल्हवत जाणाऱ्या होड्या होत्या, आता फक्त धूर ओकणाऱ्या बोटी दिसतात.
सफाळे ! या स्टेशनचा मी लहानपणापासून सफरचंद आणि केळ्याशी सबंध जोडत आलोय. अकारणच. केळी तर दिसताच नाहीत आणि सफरचंदाचा तर प्रश्नच नाही. बरेच छोटे मोठे वाडे दिसतात. श्रीमंत लोकांची येथे वस्ती आहे असं ऐकून आहे. अचानक खूप वर्षांनी ते रेल्वेचे खटके दिसले. खेचून रूळ बदलण्याचे. अमिताभच्या ' तुफान ' चित्रपटात महत्वाचा रोल केलेले.
लहानपणी रेल्वेने गावाला जाताना मी ' मामाच्या गावाला ' फेम गाणं म्हणायचो. आता कसली झाडं आणि कसलं काय? कारण आम्हीच इतक्या जोरात पळतोय कि बाहेर पाहताना बुब्बुळ स्थिर ठेवणं अशक्य आहे. रेल्वे side झोपडपट्टीची लागण इथेही झाली आहे. आत्ताच मी झो.पु.यो. म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा बोर्ड पाहिला. म्हणजे आधी झोपड्या वसावा, मग त्या पाडा आणि नंतर त्यांचं पुनर्वसन करा. ( करदात्यांना झोपवा योजना ! ) . आपल्या सरकारकडे खूप पैसा आहे याचसाठी. तिकडे विदर्भात आणि मराठवाड्यात शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय. मरू दे. आपल्याला काय? सगळे शेतकरी मेले कि मतदार संघ बदलून घ्यायचा. नेमेचि येतो पावसाळा या हिशोबाने निवडणुका तर येतीलच. पाहून घेऊ. करू काही तरी.
केळवा. मुंबईचं गोवा. beach. कुमार आणि किशोरवयीन मुलामुलींच आवडतं पर्यटन स्थळ. मुंबईबाहेरअसल्याने आणि आई वडिलांची चिंता नसल्याने यथेच्छ गर्दी. हातात बॉल पासून frisbee पर्यंत सर्व काही. ५.३०-६.३० हि मुंबईची गाडी पकडण्याची वेळ. म्हणजे ८-९ पर्यंत घरी पोहोचून प्रश्नोत्तरांची वेळ येत नाही.
अजून एक सिग्नल. राजधानी जाण्यासाठी आमची गाडी siding ला काढलेली. राजधानीच्या नावावर दुसऱ्या २-३ गाड्या पण सोडवून घेतल्या.
नवविवाहित जोडपं झोपेतून जागं झालय. चहावाल्याचा धक्का लागला बहुतेक. दुसऱ्यांच्या पोरांच्या मर्कटलीला बघत हसताहेत. स्वत:ची पोरं झाल्यावर बघणेबल असतील यांचे चेहरे. बाब्या कुठला आणि कार्टा कुठला हेच कळणार नाही.
आता लोकांचे चेहरे पालटायला लागलेत. ज्यांची गावं जवळ आलीयेत त्यांच्या चेहऱ्यावर गावाची ओढ दिसतेय. ज्यांची गावं अजून दूर आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कुतरओढ स्पष्ट दिसतेय.
Eastern side ला डोंगरांची रांग दिसतेय. बहुतेक सारे काळवंडले आहे. ढगांची सावली हेही एक कारण आहे. आणि मधूनच एक सुळका आपलं प्रकाशाचं लेणं मिरवतोय. बाकी जमिनी ओस पडल्यात. ताडामाडाची झाडं खोल गेलेली आपली मुळं चाचपडत अस्तित्व टिकावताहेत.
पालघर आणि उमरोळी बेकार स्टेशन्स. इथे काहीही नसतं. फक्त glass मधून पाणी विकणाऱ्या पोरांची लगबग आणि चेहऱ्यावरच्या अजिजी मागचं पोटातलं दैन्य, आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. आणि तिथेच भडक फुललेला गुलमोहर ! या रणरणत्या उन्हात डोळ्यांना दिलासा देतोय कि स्वत:च्या वेदना मिरवतोय? या ओसाड जमिनीवर झाडांमधून वणवा पेटल्याचा भास होतोय.
बोईसर ! Western suburbs च्या पुढे असलेली indusrtial नगरी. बरेच वर्षांपासून येथे निरनिराळे कारखाने होते. आधी फक्त रासायनिक खाते बनवणाऱ्या कंपन्या होत्या पण आता औषधांपासून बरंच काही बनतं. फेमस तारापूर अणुविद्युत केंद्र इथलंच. प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन (?) करून पसरलेला प्रकल्प.
ठणठणठण ! गाडी पुन्हा थांबली. मी तयारीत होतो. म्हटलं, लागला पुन्हा सिग्नल ! मागच्या माणसाने विचारलं उतरणार का? मी म्हटलं हो. वाणगाव आलं कि उतरतो. तो म्हणाला हेच वाणगाव, उतर लवकर. स्टेशन तर दिसेना. मारली उडी. मग इकडे तिकडे पाहिलं तर पुढे कुठे तरी स्टेशन सदृश काही तरी दिसलं. मग चालत चालत स्टेशन वर गेलो, कारण S.T.Stand तिथेच आहे. पण आजकाल तिथे S.T. येत नाही. स्थानिक दळणवळणासाठी टमटम / डमडम. ८ seater रिक्षांमध्ये १० माणसं कोंबून प्रवासनामक प्रकार सुरु होतो. मग बसलो मीही त्यांच्यात. इथे तिथे डोकं आपटत गावाला निघालो. रस्त्यांची कृपा.
आजूबाजूला निशिगंधाची शेती पाहत सफर सुरु होती. इथली फुलं निर्यात होतात म्हणतात. पण होती मस्त सुरेख ती शेती. सकाळी सकाळी या शेतातून फिरायला धमाल येते. दुपारच्या वेळी फिरलं कि डोक्यावरच उन जाणवेनास होतं. संध्याकाळी तर खाट टाकून झोपायची इच्छा होते.
बस, एकदाचा पोचलो आणि निश्वास सोडला. पण गावाच्या मातीचा सुगंध वेगळाच. शेणाच्या, मातीच्या आणि धुराच्या संगमातून जे निघतं तो गावाचा वास! आल्हाददायक प्रकार. घरी bag टाकली आणि पाणी प्यायलो. हे गावोगावीच मचूळ पाणी, जे माझ्या आई वडिलांना गोड लागतं.
पण असो, अपने मिट्टी कि खुशबू और कुवे का पाणी सबको प्यारा हि लगता है ...