Sunday, 13 March 2011

अथांग वेदनेचा वेध (एक प्रवास... एक प्रयास)

  भाग १
रात्र काळी घागर काळी 
                                                                             चिंतामण त्र्यंबक खानोलकर

 लक्ष्मी  - एका सुंदर आणि निष्पाप मुलीची स्वप्न उध्वस्त झाली ती तिच्याच दैवी सौंदर्यामुळे. तिचा पुरूष तिच्या सौंदर्याला भुलला नाही पण घाबरला जरूर. जेव्हा लक्ष्मीने त्याच्यातल्या पुरुषाला डिवचलं तेव्हा चवताळून त्याने तिचा बलात्कार केला आणि " चुकार बीज पेरलं गेलं ". पण जेव्हा ती फणा काढून उभी राहिली तेव्हा मात्र तो शेपटात पाय घालून पळाला. " हे शंभर नंबरी सोनं नव्हेच " असं त्याला वाटलं आणि तो जाईकडे (भाविणीच्या मुलीकडे) वळला. त्यामुळे लक्ष्मी मुळातूनच कापल्यासारखी झाली. जे सुख पत्नी (ब्राम्हणाची पोर असूनही) म्हणून तिला नाकारलं गेलं तेच सुख एका भाविणीच्या पोरीला विनसायास मिळालं याची चीड तिच्या मनात कायम राहिली.शरिरसुखासाठी तिने व्यभिचाराचाही आधारही घेऊ पाहिला, पण शापित सौंदर्याच्या जवळपासही कुणी फिरकू शकला नाही. सूर्यावर थुंकण्याची कुणाचीही प्राज्ञा झाली नाही, जळून खाक होण्याची भीती होती.

रात्र काळी घागर काळी मध्ये खानोलकरांनी लक्ष्मी आणि जाई या दोन परस्पर विरोधी व्यक्तिरेखा चितारल्या आहेत. लक्ष्मीला अप्रतिम सौंदर्याचा ठेवा मिळूनही प्रेमाला ती पारखीच राहिली तर जाई एका भाविणीची मुलगी असल्याने दिगंबरला (लक्ष्मीचा नवरा) ती सहजप्राप्त होती आणि त्याने तिचा उपभोग घेतला. (काळानुरूप त्यात काही वावगं नव्हतं). तर जाईची नेहमीच कुचंबणा झाली. दिगंबरला सर्वस्व देउनही ती बहिष्कृतासारखी जगली. कारण ज्या दिगंबराचा अंश ती " पोटी थोराचे बीज " म्हणून वाढवत होती तो गर्भच जिरला.
 
 
 कादंबरी लिहिताना कोकणाचा जो गूढ माहौल खानोलकरांनी निर्माण केला आहे की वाचता क्षणीच निर्मिकाला मनातून दाद जाते. त्यांनी वर्णनात्मक  शैलीचा अवलंब केल्याने कादंबरी प्रवाही झाली आहे. इतकी प्रवाही की बरेचदा ती वाचणारयाला स्वत:बरोबर फरफ़टत नेते. जेव्हा कादंबरी संपते तेव्हा मनासकट बरच काही सुन्न होतं. संवेदना या शब्दाची फोड कशी होते ठाऊक नाही पण सह-वेदना काय असू शकते याचा प्रत्यय येतो.

Saturday, 12 March 2011

अथांग वेदनेचा वेध (एक प्रवास... एक प्रयास)

रात्र काळी घागर काळी                 चिं.त्र्यं.खानोलकर

बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी           राजन खान

    वरिल दोन पुस्तकं वाचुन मनात प्रचंड गोंधळ माजलाय. विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय.


   एक प्रचंड पट आहे बुद्धिबळाचा,
   त्याच्या पहिल्या बाजूला लक्ष्मी (रात्र काळी घागर काळी) आणि
   अमलाक्का (बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी)
  
   
   आता यातली खरी कोण ? पण दोघीही खरया आहेत. बुद्धिबळ म्हणजे सगळ्या तत्वज्ञानांचा मुकुटमणी आहे. य़ात या दोघीही नायिका आहेत आणि या दोघीच प्रतिनायिकाही आहेत.

एक छोटीशी गोष्ट...

मी एक स्वप्न पाहिलं. त्यात मी एका देवालयात फिरत होतो. अद्भुत आणि विस्मयचकित होण्याइतपत सुंदर होतं ते.  अचानक मला हुंदक्यांचा आवाज आला. मी पुढे गेलो, तिथे एक म्हातारा मनुष्य गुढग्यात मान घालून रडत होता. मी पुढे होउन त्याला सांत्वनपर स्वरात विचारलं," काय झालं आजोबा? का रडताय? नाव काय तुमचं? " तर म्हातारा उत्तरला," परमेश्वर " . मी त्याच्या डोळ्यात वेडाची झाक दिसते का ते पाहून घेतलं. नव्हती ! मी पुन्हा विचारलं," का रडताय? " तो म्हणाला," माझ्या एकुलत्या एका मुलाने मला फसवलय. " मी विचारलं," काय नाव आहे त्याचं? " तो म्हणाला, " मनुष्य."

लिओ टॉलस्टॉय   

Sunday, 6 March 2011

विचार करा....

आपण कसे असतो आणि कसे घडतो? उदाहरणार्थ मी पुरुष आहे ( माझी प्राथमिकता ), मी मुलगा आहे आणि बाप होईन (हे द्वितीय). मी माणूस कधी होतो आणि नसलो तर कधी होईन. माझं पौरुष काय आहे किंवा काय होऊ शकतं? बायकोला (किंवा मुलींना) गरोदर केल्याशिवाय माझं पौरुष सिद्ध होणारच नाही का? पौरुष हिंसक आणि वेदनादायीच का असावं? ते अलवार किंवा तरल का असू नये?

हे सगळे प्रश्न आपल्या मानसिकतेत दडलेले आहेत. बरयाच म्हणी याचेच दाखले देतात. " चुरगळ्याखेरीज अत्तराचा परिमळ दरवळत नाही", याचा काय अर्थ काढायचा ? स्त्रीला अत्तराची उपमा दिलीये की तिला नासवल्याखेरीज मजा येणार नाही हे सांगितलय? वेदनांकित सुख खरच असातं कि हेही मनावर ठसवल गेलय? बरयाच स्त्रिया खाजगीत मान्य करतात कि संभोग हा वेदनादायीच असतो आणि पुरुष मानतात कि जेवढ्या वेदना जास्त तेवढी 'मर्दानगी' जास्त. अनादी काळापासुन हेच चालत आल आणि राहीलही. पण मग सुख कुठे गेलं आणि ते कसं मिळेल हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

एक तर आपल्याकडे हा विषय वर्ज्य. कोणी बोलत पण नाही. कोणालाच हा प्रश्न पडत नाही का? कि आपली मानसिकताच अशी झालिये कि प्रवास वेदनेतून सुखाकडे जातो असं मानलं जातं?
 मी अमुक एवढ्या मुलींचे गर्भपात करवले यावर कसं कोणाचं पौरुष सिद्ध होऊ शकतं? काही जोडपी एवढी निष्णात असतात कि दिवस मोजून आणि वजाबाक्या करुन कार्यभाग सिद्ध करतात आणि वर कसं manage केलं यावर टाळ्या घेतात. यात कौतुकास्पद काय आहे? कोणी काय करावं हे मी ठरवू इच्छित नाही तरि एकाची वेदना दुसरयाचं सुख कसं असू शकते?

मानवी शरिराच्या गरजांचं प्रमाण व्यस्त असू शकतं आणि असेलही. पण हा काही उपाय ठरू शकत नाही. गरज नाकारण ही उपाय नाही. लीव  इन  रिलेशनशीपला माझा पाठिंबा आहे पण विवाहबाह्य संबंधांना नाही. कारण मानलं तर आहे फरक आणि मानलं तर नाही. मी मानतो फरक. आज कायदा आहे लीव  इन  रिलेशनशीप साठी आणि विवाहबाह्य संबंधांसाठी नाही यातंच सारं काही आलं.

लीव  इन  रिलेशनशीपची चर्चा झाली आणि विवाहबाह्य संबंधांची नाही झाली. विवाहबाह्य संबंध अनादी काळापासुन आहेत फक्त चर्चा झाली नाहिये. उदाहरणार्थ , राजा राणीला मूल होत नाहिये, ‍मुनीचा आशिर्वाद घेतला, झालं मूल. मूल काही आकाशातून तर नाही ना पडलं? पुरुष आणि स्त्रीचा संबंध आल्याशिवाय जीव जन्माला येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. [आपण समजू TEST TUBE BABY तेव्हाचा शोध होता जो कालचक्रात आपल्याकडून हरवला. उदा. कौरव] पण कुंती आणि माद्रीचं काय? पंडुराजाने पंडुरोगात पौरुष गमावलेलं, मग पांडव त्याचे पुत्र कसे? बाप असणं आणि नाव देणं यातही फरक असेलंच कि. कर्ण कुंती आणि सूर्याचा अनौरस पुत्र म्हणून का गणला गेला? हे विवाहबाह्य संबंध नव्हते ?

खूप पूर्वी इजिप्त आणि रोमन राज्यामध्येही एक प्रथा होती. राजा जर पुरुष नसेल तर राणी सबंध राज्यातील कुठल्याही पुरुषाकडून हे सुख प्राप्त करुन राज्याला वारस देऊ शकते.
अमिताभ आणि सैफ अली खानच्या 'एकलव्य' चित्रपटाचा हाच विषय होता.


आता लीव  इन  रिलेशनशीप कडे वळतो. हे ही नवीन नाहीये आपल्याला. जे नक्षलवादी किंवा लाल (communist) चळवळीत होते किंवा ज्यांनी त्याबद्दल वाचलय त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते. एकाच ध्येयाने प्रेरित होउन एकाच दिशेने वाटचाल करणारया त्या माणसांना नव्हत्या का शारिरीक गरजा? ज्यांनी (लग्न न करता) एकत्र राहून त्या मिळवल्या किंवा भागवल्या ते आपल्या लीव  इन  रिलेशनशीपचे आद्य उपासक आणि प्रचारकच आहेत.

लीव  इन  रिलेशनशीप आणि विवाहबाह्य संबंधांमध्ये एक मूलभूत फरक आहे. लीव  इन  रिलेशनशीप मध्ये स्वातंत्र्य आहे(मानलं तर).  विवाहबाह्य संबंधांमध्ये सुरुवात होते ती गरज म्हणून आणि शेवट होतो तो वापरुन घेतल्याच्या जाणिवेत, (स्त्री आणि पुरुष दोहोंसाठी). आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरिल अत्याचारांनानेहमीच झुकते माप दिले जाते तरिही पुरूषांसाठी तो नेहमीच तोंड दाबून बुक्कयांचा मार ठरतो. (ठरू शकतो)
   कळावे,                                                                                                                                प्राक्तन पाटील