Saturday, 26 November 2011

रात

रात के घने सायेमें
खामोशियोंको झगडते देखा
सन्नाटोंको दहलिज़ छूते देखा

जब सन्नाटा खामोशियोंको को चीरता जाएगा
फ़िर सहेर की नयी गुंज उठेगी
जिसमें शायद दोनो उजाले में तब्दील हो जाऐंगे

फ़िर इक दिन जाएगा
और फ़िर से इक रात आएगी . . .

एक पुरातन माधवी . . .

एक पुरातन माधवी

महाभारताच्या उद्योगपर्वात ही माधवी भेटते. धर्मसत्तेच्या पाशात अडकून केवळ एक वस्तू म्हणून इथून तिथे फेकली गेलेली. विश्वामित्राला गुरुदक्षिणा द्यायची म्हणून गालव काय गुरुदक्षिणा हवी विचारतो, आणि संतप्त विश्वामित्र ८०० श्यामकर्ण श्वेत अश्व मागतो.  ते अश्व मागायला गालव ययातिकडे जातो पण ययातिकडे ८०० अश्व नसतात. पण याचकाला विन्मुख पाठवायचं नाही म्हणून तो स्वत:ची उपवर मुलगी, माधवी, गालवाला देतो आणि सांगतो, जो तुला ८०० श्यामकर्ण श्वेत अश्व देईल त्याला माझी कन्या अर्पण कर आणि तू गुरुऋणातून मुक्त हो.  मग गालव तिला घेऊन प्रत्येक राजाकडे अश्व मागायला जातो, परंतु एकत्र ८०० अश्व त्याला कुठेच मिळत नाहीत. मग प्रत्येकी २०० अश्वांच्या मोबदल्यात माधवी अनुक्रमे हर्यश्व, दिवोदास आणि उशीनर या राजांकडे एकेक वर्ष राहते आणि प्रत्येकापासून एकेक पुत्र प्रसवते. पुन्हा २०० अश्वांचा प्रश्न उरतोच, तेव्हा विश्वामित्र तिला वर्षभर स्वत:पाशी ठेवतात आणि त्यापासूनही ती एक पुत्र प्रसवते.


आता प्रश्न येतो तो हे नक्की काय होतं ? कारण जर हे स्त्रियांचं उदात्तीकरण (sublimation) आहे तर एक उपभोग्य वस्तू म्हणून तिचा झालेला वापर कसा नाकारता येईल?

त्या काळात स्त्रियांचं स्थान जनमानसांत नक्की काय होतं यावर ही कथा प्रकाश टाकते. आणि याहून संतापाची गोष्ट अशी की एवढ्यावरच तिचे दुर्दैव संपल नाही. तिची देवाणघेवाणही झाली. म्हणजे फक्त उपभोग (exploit) न घेता देवाणघेवाणही (exchange) झाली. त्या  प्रत्येकाकडून तिला एकेक पुत्रही झाला. पण या सगळ्यात आपल्या तथाकथित भारतीय संस्कृतीत असलेली योनिशुचितेची महत्ता (magnitude) कुठे गेली?

कोण उत्तर देईल या प्रश्नाचं ?



प्राक्तन पाटील




Thursday, 24 November 2011

आमचे प्रिय(?) मोरे काका...

                                मोरे काका..                                                                                             व्यक्तिरेखा १
 

अरे परवा मोरे काका भेटले. इथेच राहतात. मी चाललो होतो गुपचुप तर धरलं मला. मोरे काका म्हणजे अट्टल पकावू माणूस ! मी लांबूनच पळणार होतो पण म्हातारयाची नजर वयाच्या मानाने भलतीच तीक्ष्ण.

मोरे काका - थांब थोडावेळ.
मी - नको काका, जरा घाईत आहे.
काका - बस रे निवांत, काय तो मोबाईल घेऊन कुठे जानार तुम्ही मंडळी ?

[मी बसलो. आणि मग कोसळायला लागल्या गप्पा. म्हणजे ते बोलत होते आणि मी ऐकत होतो.]

काका - तर सांगायची गोष्ट अशी की, आज आहे देव दिवाळी. तर मी त्या मोरेच्या पोराला म्हटलं की लाव जरा तोरण वगैरे. पण तो काय आता मोठा झाला, माझं कशाला ऐकेल ? संस्कृतिभंजक लेकाचे!
 
[मी - ( मनातल्या मनात ) प्रत्येक गोष्ट सांगायचीच असते का? आता हा दुसरा मोरे याचाच साडू. दोघांतून विस्तव जात नाही तर त्याचा पोरगा नाही ऐकत. आता ह्याला मी काय करु ? आणि इतक्या वर्षांत मी पण नाही लावला कधी कंदिल वा तोरण. मग काय मी संस्कृतिभंजक झालो ? मी बोलणार होतो. पण इथे म्हातारबुवा पेटलेले. ]

काका - अरे आमचा राजू आहे ना अमेरिकेत. दर महिन्यात सत्यनारायणाची पूजा घालतो. अगदी पितांबर अन् जानवं घालून हो.
मी - पण राजू दादाला येतात श्लोक?
काका - नाही रे. CD लावतो. पण सांगायची गोष्ट अशी की भाव तर मनात हवा ना? काय?
मी - अगदी अगदी. पण मी काय म्हणतो काका, राजू दादा इथे पण करायचा का हे सगळं ?
काका - अजिबात नाही. तो काय देवाच्या पाया पण पडत नव्हता.

[मी माझं पराकोटीचं कुत्सित हसू दाबलं आणि विचारता झालो.]

मी - मग अचानक तिकडे जाऊन पूजा वगैरे...?
काका - तिकडे खूप एकटं वाटत रे.

[ मी मनात - का नाही वाटणार एकटं? बायको फिरंगी, पोरं पण अर्ध फिरंगी, मायदेशाची नाळ आणि मूळं तोडलेली आता बांडगूळासारखं जगायचं म्हटल्यावर ही सगळी सोंग करावीच लागणार. ]

काका - चल PHOTO दाखवतो तुला त्यांचे.

[ हरि हरि! मग  गेलो त्यांच्या घरी.
मग हे दाखव ते दाखव. तरी माझं नशीब थोर म्हणून त्यांच्या फिरंगी सूनबाईचे साडीतले PHOTO सापडत नव्हते.. ]

काका - आगं, कोण ती राजूची बायको आर्याच (AARYA)  ना? सापडत नाहीये ती कुठे...
काकू - आहो, किती वेळा सांगू की आर्या नाही अरिया (ARIA) नाव आहे म्हणून.
काका - सापडले. हे बघ.

[ आणि नंतर जे दिसलं की ज्याचं नाव ते.  त्या ARIA बाईने TRANSPARENT साडी नेसायची म्हणून TWO PIECE BIKINI घालून लुंगी नेसावी तशी साडी गुंडाळून उरलेलं उरलेलं जेवढं काही होतं ते खांद्यावर टाकलं होतं. मी चकित, चाट आणि अजून काही असले 'च' ने आरंभ होणारे शब्द उरले असतील ते सगऴे एकत्रच झालो.
आवंढा गिळून आणि डोळ्यावर अनैच्छिक कातडं ओढून काकांना विचारलं - ]

मी - राजू दादाने नेसवली का साडी ?
काका - छे. त्याला कसली येतेय? तुझ्या काकूने STEP BY STEP PHOTO काढून पाठले होते.
मी - वा काकू वा ! हि नामी शक्कल लढवली.
काकू - मग काय? इतके वर्ष नांदले बाबा मी यांच्यासोबत. डोकं नसत चालवलं तर भागलं असतं का रे बाबा?

[ मी निरुत्तर. बर तिथेच संपलं. मी आपला चहाची वाट बघत होतो] 


काका - (दरवाजा उघडून) निघतोस म्हणतोस? जा बाबा. तुला पण असतीलच की तुझी कामं. येत रहा असा अधून मधून.विसरू नको रे बाबा. बरं नाव काय म्हणालास तुझं ?



Monday, 17 October 2011

दुर्योधन

महाभारताचा खलनायक म्हणून आपण याला ओळखतो. पण याच खलनायकाच अनुकरण आजवर होत आल आणि जे जिंकले ते जेते ठरले आणि जे हरले ते नष्ट झाले. तरिही आपण त्याला खलनायक म्हणूनच ओळखतो.

त्याची दुसरी बाजू का मांडली गेली नाही आणि त्यावर चर्चाचर्वण का झालं नाही ?

तो हस्तिनापूर महाराज्याचा राजपुत्र होता. जेष्ठ व श्रेष्ठ कौरव होता. का असू नये अभिमान ? का असू नये गर्व ? राजा अंध असूनही राज्याचा उत्कर्ष होत होता आणि त्याचं श्रेय निर्विवाद दुर्योधनाला जातं. कारण तो प्रचंड महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी होता.
पांडवाच्या इंद्रप्रस्थात, मयसभेत फजिती झाल्यावर स्वाभिमान ( अहंकार नाही ) डिचवला जाणं सहज होतं. याज्ञसेनीचं हास्य आणि शब्द विखारी होते.
" अंधुपत्र दुर्योधन पण आंधळे आहेत हे ठाऊक नव्हतं. "
दुर्योधनाचं मन पेटून उठलं," तात या शब्दाचा अर्थ कळतो का याज्ञसेनीला ? माझ्या तातांच्या व्यंगावर भाष्य करण्याएवढी ती सूज्ञ आहे का? "
{ याज्ञसेनीचा जन्म यज्ञकुंडातून झाला होता आणि द्रुपद तिचा biological पिता नव्हता. }
याज्ञसेनीचं हास्य आणि शब्द सर्वस्वी पूर्वग्रह दूषित आणि चूकीचे होते.

पुढे पांडव द्यूतात हरून वनवासात गेल्यावर दुर्योधनाने हस्तिनापूरात युद्धसामग्रीच्या कार्यशाळा उभारण्यामागे केवढा दूरदर्शीपणा होता. त्याला सदैव हे ठाऊक होतं की पांडव परत आल्यावर सत्तासंघर्ष अटळ आहे. कारण एकाच राज्याचे दोन राजे असूच शकत नाहीत. तसं झाल तर राज्याच विघटन होत जातं. राजा आणि मांडलिक हे समिकरण त्याला मान्य नव्हतं. त्याला पुरेपूर ठाऊक होत की एक जेता असतो आणि बाकीचे जितं असतात. जर त्याच्यासारख्या राजपुत्राने जेता होण्याचं स्वप्न नाही पाहायच तर कोणी पाहायच ?
" माझ्या तातांच्या राज्यावर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सर्वस्वी माझाच हक्क आहे. कौरवांच अन्न खाऊन पांडवांचे गुणगान गाणारया या भाटांना काय कळणार या दुर्योधनाची व्यथा आणि वेदना ? "

त्याला खूपच कमी पाठराखे मिळाले. कर्ण, अश्वत्थामा आणि दु:शासन. कर्णावर तर भावाहून अधिक माया आणि विश्वास.
" पांडव अज्ञातवासातून परतल्यावर शिष्टाई करायला कृष्ण आला होता. मी माझ्या राज्याचे तुकडे सहनच करू शकत नव्हतो. मी युद्धाचा पर्याय निवडला. कृष्णाने मला सर्वविनाशकारी युद्धाची कल्पना दिली. पण मला कर्णावर पूर्ण विश्वास होता. आणि म्हणूनच आयुष्यातल सर्वात मोठं द्यूत मी खेळायच ठरवलं. "

" गुरूपुत्र अश्वत्थामा माझा सहकारी. माझ्या सुखदु:खात मोलाची साथ आणि सल्ला देणारा. माझं मन तिघांनाच कळलं. तात, कर्ण आणि अश्वत्थामा. माझ्या दुर्दैवी मृत्यूनंतरही पांडवांचा प्रतिशोध घेण्यासाठी त्यांच्या मुलांचा अंत करणारा. कृष्णाने त्याच्या भालप्रदेशातील मणी काढून घेतला. तो स्फटीक त्याच अस्तित्व होता. परिणामांना अज्ञ नसताना त्याने हे कृत्य केलं आणि तेही तो स्वत: अमर असताना. "

" दु:शासन माझी सावलीच होता. माझ्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्याने झेलला. अगदी द्यूतानंतर माझं नैतिक अध:पतन झाल्यावरही त्याने माझी आज्ञा मानून भर सभेत याज्ञसेनीची वस्त्र फेडली. त्यावर भीमाची प्रतिज्ञा ऐकूनही तो तसूभरही हलला नाही. पण माझ्या काळजाचा थरकाप उडाला होता. दु:शासनाच्या युद्धकौशल्याची चिंता नव्हती पण भीमाच्या अमानवी शक्तिची भीती होती. "



* द्रौपदीच्या वस्त्रहरणावरून झालेली टिका अनाठयी वाटते. कारण युद्धात जेथे कृष्णासारख्या नारायणाला कोप आवरला नाही आणि त्याने कर्णावर रथचक्र उगारलं, तेथे दुर्योधन तर साधारण नर होता. आणि त्याचा कोप का अनाठायी असावा?

कर्ण

दाता म्हणून प्रसिद्ध पण याचक म्हणून नेहमीच ओंजळ रिकामी असणारा. ओंजळच काय, मनातले भाव सोडले तर सगळच रिक्त होतं. जन्मदात्या आईने झिडकारलं, जगाने सूतपुत्र म्हणून हिणावलं.
    " माझ्या आयुष्याच्या निर्णायक क्षणी माझी आई, अंह राधाई नव्हे, जन्मदात्री आई, कुंती, माझ्याकडे आली आणि मागितलं तर काय, माझ्या पुत्रांना जीवनदान दे. मग मी कोण ? मी वचन दिलं होतं दुर्यधनाला, अर्जुनवधाचं. आता मी दोन्ही बाजूंनी बांधला गेलो होतो. म्हणून मी सांगितलं, उद्या सूर्यास्तापर्यंत पाचच पांडव जिवंत असतील, मी सोडून किंवा अर्जुन सोडून. "
      त्यावेळी कर्णाच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? एकीकडे आई भेटल्याचा आनंद तर दुसरीकडे तिचे अन्य सहोदरांवरील प्रेम पाहून त्याचं मन तर प्रेमाला पारखंच राहीलं असेल.
    "  मी तर नेहमीच परका राहीलोय. एक दुर्यधनाची मैत्री सोडली तर माझ्या आयुष्यात काहीच उरत नव्हतं. म्हणूनच तो चूकत असतानाही मी पूर्ण विचारपूर्वक त्याची बाजू घेतली. मी दाता म्हणून प्रसिद्ध असलो तरि एक याचक म्हणून मी नेहमीच रिक्त हस्ते परतलोय. "






* आपल्या सगळ्याच्या मनात कर्ण दडलेला असतो. मी प्रयत्न केलाय माझ्या मनातल्या कर्णाला न्याय देण्याचा.

सामाजिक बांधिलकी म्हणजे काय रे भाऊ ?

खरच काय असतं हे ? कारण आपण लहानाचे मोठे होताना ५६ वेळा ऐकतो हा शब्द. एखादा शब्द वापरताना त्याचा अर्थ माहित असलाच पाहीजे अशी पद्धत अजूनतरी आपल्याकडे नाही आहे. मोठे मोठे शब्द वापरून वजन निर्माण करण आणि अजून मोठे शब्द वापरुन ते टिकवणं महत्वाच.

तर विचारायचा हेतू निर्मळ आहे. मला याचा अर्थ हवाय. कारण बांधिलकी आपण बरयाच नात्यांत पाहतो. रक्ताचीच असतात बहुतेक नाती. मग समाजाच काय? तो मधेच कुठून आला? मी माझ्या समाधानासाठी अर्थ काढलाय पण परत असंख्य प्रश्न निर्माण झालेत. तर मी आधी अर्थ सांगतो आणि प्रश्न विचारतो.

सामाजिक बांधिलकी म्हणजे बहुतेक आपल्या समाजाबद्दल आपुलकी वाटण.  इथेच पहिला प्रश्न येतो. कुठला समाज माझा ? मी ज्या भाषेतला / जातीतला / धर्माचा / देशाचा आहे तो ? मग तर मी ४ समाजात आहे.

१. आधी भाषा - माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी प्रामुख्याने मराठी व इंग्रजी भाषा बोलतो. मग माझा भाषिक समाज कोणता ? मराठी की इंग्रजी ?

२. माझी जात - माझी जात क्षत्रिय असली म्हणुन मी काय लढायला जात नाही. बाकी कोण क्षत्रिय आहे ते मला माहित नाही. गावात पण १७६० उपजाती. कोणी चौकळशी तर कोणी पाचकळशी. आता दोन्ही जाती क्षत्रियकुलोत्पन्न आहेत, तरी पाचकळशी स्व:ताला श्रेष्ठ समजतात. इतरही जाती आहेत, पण मला पुरेशी माहिती नाही. मग क्षत्रिय हा जातिवाचक समाज कोणता ? आणि तो माझा कसा ?

३. माझा धर्म - माझा धर्म जन्माच्या दाखल्यावर हिंदू आहे म्हणून मी हिंदू. बाकी माझ्यात हिंदुत्ववादी असं काहीच नाही. ना मला हिंदू असण्याचा अभिमान ना मला हिंदू असण्याची लाज !
[ एकदा वाटली होती, गोध्रा दंगलींच्या वेळेला ]
मी गोमांस (beef) खातो. आता मी नास्तिक आहे तर गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात, म्हणून गोमांस निषिद्ध आहे अस काही मी मानत नाही. मला सूकरमांसही (pork) वर्ज्य नाही. दोन्ही मी आवडीने खातो.
[ हिंदूंना गोमांस आणि मुस्लिमांना सूकरमांस निषिद्ध आहे, असं म्हणतात. ]
मी जन्माने हिंदू आणि करणीने हिंदू नाही आणि जन्म वा करणीने मुस्लिम पण नाही. मग मी कोण ? आणि माझा धार्मिक समाज कोणता ?

४. माझा देश -  मी इंडियामधे राहतो आणि तरीही माझा देश भारत आहे. इंडिया आणि भारतातला फरक कळण्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून भारतच माझा देश आहे !
[ आभार - शालेय पुस्तकांतील प्रतिज्ञा (pledge) ] .
आता इंडियन सोसायटी ( Indian society) माझी  की भारतीय समाज माझा ?


माझी सामाजिक बांधिलकी कुठली मग ? आणि ती कुठल्या समाजाप्रति असावी ?



लोभ असावा,

कळावे,
प्राक्तन पाटील

Sunday, 16 October 2011

सार्वजनिक गणेश उत्सव...

मुंबई मधे सार्वजनिक गणेश उत्सव एक cult आहे. राजकीय पक्ष्यांना आपली पकड आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपले प्रिय जोखड दाखवायची सार्वजनिक संधी. तसे आपल्याकडे बरेच सार्वजनिक सण आहेत. पण गणेश बोले तो राजा ना. मग त्याचा सण पण मोठाच हवा. मग वर्गणी म्हणून कोणीही कितीही पैसे हक्काने मागतो, आणि आपण झक्कत देतो. नाही देत म्हटल की देवाच्या अद्यात कोपाची (?) भीती घालून पैसे उकऴले जातात. आणि एखादा नग भेटला की त्याला धमकावून पैसे नाही मिळाले तर परभारे देवाच्या नावावर शाप देऊन मोकळे होतात.
कालचीच गोष्ट घे. दोन इमारती सोडून तिसरया इमारतीत सार्वजनिक गणेश उत्सव असतो. आता त्यांचा आणि माझा काय संबंध? पण ते प्रत्येक घरी जाउन वर्गणी गोळा करून गेले. बर प्रसाद द्यायला तरी येतात का? तर नाही. तुम्ही या आणि प्रसाद घेऊन जा. पण वर्गणी मागायला येणार. माझ्या घरी कोणी नव्हतं म्हणून मला रस्त्यातच धरलं. " चल, वर्गणी दे, १५१ रुपये. " मी म्हटल, "कसली बाबा?" तर एखादंया वेड्याकडे पहाव तस पाहून म्हणतो," सार्वजनिक गणेश उत्सवाची" . मी म्हटल," मी काही देव मानत नाही" . तर म्हणतो," अरे गाढवा, त्याच्याच कृपेने तर दोन सुखाचे घास खातोस ना?"  मी म्हटल,"आईच्या कृपेने खातो" . तर म्हणतो, " मग त्यांना देवाच्या कृपेने मिळालेत अस समज आणि वर्गणी दे." मग मी पण अडून बसलो. पैसे काय झाडावर लागतात होय? आणि लागले तरी याच्यासारख्या फुकट्याना कशाला द्यायचे? मग म्हटल, जरा खेचुया याची. मी विचारला," १५१ कशाला रे? श्रद्धा तर मनात असते ना. मग मी १५१ दिले काय आणि ११ दिले काय देवाला दोन्ही सारखेच ना. की तुमच्या देवाला तुम्ही १५१ ची सवय लावली आहे? " तर म्हणतो, " आमचा देव म्हणजे? हा तुझा पण देव आहे." मी म्हटल," माझा देव मी ठरवणार, तू कोण मला सांगणारा? आणि तसाही हिंदूंमधे ३३ कोटी आहेत. ज्याला जो हवाय त्याने तो घ्यावा. मग एखाद्या देवाची जबरदस्ती कशाला? " त्याने माझ्याकडे भूत पाहाव तस पाहिला आणि म्हणाला," ते तुझा तू ठरव. पण मी वर्गणी घेऊनच जाणार." मग मी म्हटला," पण मी नास्तिक आहे राजा. नास्तिकाचा पैसा तुमच्या देवाला कसा चालेल?" तर म्हणतो कसा," तू असशील नास्तिक, पण पैसा काही आस्तिक वा नास्तिक नसतो."
अर्थात मी काही पैसे दिले नाहीतच. पण मजा सांगाविशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच.

कळावे,

Sunday, 13 March 2011

अथांग वेदनेचा वेध (एक प्रवास... एक प्रयास)

  भाग १
रात्र काळी घागर काळी 
                                                                             चिंतामण त्र्यंबक खानोलकर

 लक्ष्मी  - एका सुंदर आणि निष्पाप मुलीची स्वप्न उध्वस्त झाली ती तिच्याच दैवी सौंदर्यामुळे. तिचा पुरूष तिच्या सौंदर्याला भुलला नाही पण घाबरला जरूर. जेव्हा लक्ष्मीने त्याच्यातल्या पुरुषाला डिवचलं तेव्हा चवताळून त्याने तिचा बलात्कार केला आणि " चुकार बीज पेरलं गेलं ". पण जेव्हा ती फणा काढून उभी राहिली तेव्हा मात्र तो शेपटात पाय घालून पळाला. " हे शंभर नंबरी सोनं नव्हेच " असं त्याला वाटलं आणि तो जाईकडे (भाविणीच्या मुलीकडे) वळला. त्यामुळे लक्ष्मी मुळातूनच कापल्यासारखी झाली. जे सुख पत्नी (ब्राम्हणाची पोर असूनही) म्हणून तिला नाकारलं गेलं तेच सुख एका भाविणीच्या पोरीला विनसायास मिळालं याची चीड तिच्या मनात कायम राहिली.शरिरसुखासाठी तिने व्यभिचाराचाही आधारही घेऊ पाहिला, पण शापित सौंदर्याच्या जवळपासही कुणी फिरकू शकला नाही. सूर्यावर थुंकण्याची कुणाचीही प्राज्ञा झाली नाही, जळून खाक होण्याची भीती होती.

रात्र काळी घागर काळी मध्ये खानोलकरांनी लक्ष्मी आणि जाई या दोन परस्पर विरोधी व्यक्तिरेखा चितारल्या आहेत. लक्ष्मीला अप्रतिम सौंदर्याचा ठेवा मिळूनही प्रेमाला ती पारखीच राहिली तर जाई एका भाविणीची मुलगी असल्याने दिगंबरला (लक्ष्मीचा नवरा) ती सहजप्राप्त होती आणि त्याने तिचा उपभोग घेतला. (काळानुरूप त्यात काही वावगं नव्हतं). तर जाईची नेहमीच कुचंबणा झाली. दिगंबरला सर्वस्व देउनही ती बहिष्कृतासारखी जगली. कारण ज्या दिगंबराचा अंश ती " पोटी थोराचे बीज " म्हणून वाढवत होती तो गर्भच जिरला.
 
 
 कादंबरी लिहिताना कोकणाचा जो गूढ माहौल खानोलकरांनी निर्माण केला आहे की वाचता क्षणीच निर्मिकाला मनातून दाद जाते. त्यांनी वर्णनात्मक  शैलीचा अवलंब केल्याने कादंबरी प्रवाही झाली आहे. इतकी प्रवाही की बरेचदा ती वाचणारयाला स्वत:बरोबर फरफ़टत नेते. जेव्हा कादंबरी संपते तेव्हा मनासकट बरच काही सुन्न होतं. संवेदना या शब्दाची फोड कशी होते ठाऊक नाही पण सह-वेदना काय असू शकते याचा प्रत्यय येतो.

Saturday, 12 March 2011

अथांग वेदनेचा वेध (एक प्रवास... एक प्रयास)

रात्र काळी घागर काळी                 चिं.त्र्यं.खानोलकर

बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी           राजन खान

    वरिल दोन पुस्तकं वाचुन मनात प्रचंड गोंधळ माजलाय. विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय.


   एक प्रचंड पट आहे बुद्धिबळाचा,
   त्याच्या पहिल्या बाजूला लक्ष्मी (रात्र काळी घागर काळी) आणि
   अमलाक्का (बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी)
  
   
   आता यातली खरी कोण ? पण दोघीही खरया आहेत. बुद्धिबळ म्हणजे सगळ्या तत्वज्ञानांचा मुकुटमणी आहे. य़ात या दोघीही नायिका आहेत आणि या दोघीच प्रतिनायिकाही आहेत.

एक छोटीशी गोष्ट...

मी एक स्वप्न पाहिलं. त्यात मी एका देवालयात फिरत होतो. अद्भुत आणि विस्मयचकित होण्याइतपत सुंदर होतं ते.  अचानक मला हुंदक्यांचा आवाज आला. मी पुढे गेलो, तिथे एक म्हातारा मनुष्य गुढग्यात मान घालून रडत होता. मी पुढे होउन त्याला सांत्वनपर स्वरात विचारलं," काय झालं आजोबा? का रडताय? नाव काय तुमचं? " तर म्हातारा उत्तरला," परमेश्वर " . मी त्याच्या डोळ्यात वेडाची झाक दिसते का ते पाहून घेतलं. नव्हती ! मी पुन्हा विचारलं," का रडताय? " तो म्हणाला," माझ्या एकुलत्या एका मुलाने मला फसवलय. " मी विचारलं," काय नाव आहे त्याचं? " तो म्हणाला, " मनुष्य."

लिओ टॉलस्टॉय   

Sunday, 6 March 2011

विचार करा....

आपण कसे असतो आणि कसे घडतो? उदाहरणार्थ मी पुरुष आहे ( माझी प्राथमिकता ), मी मुलगा आहे आणि बाप होईन (हे द्वितीय). मी माणूस कधी होतो आणि नसलो तर कधी होईन. माझं पौरुष काय आहे किंवा काय होऊ शकतं? बायकोला (किंवा मुलींना) गरोदर केल्याशिवाय माझं पौरुष सिद्ध होणारच नाही का? पौरुष हिंसक आणि वेदनादायीच का असावं? ते अलवार किंवा तरल का असू नये?

हे सगळे प्रश्न आपल्या मानसिकतेत दडलेले आहेत. बरयाच म्हणी याचेच दाखले देतात. " चुरगळ्याखेरीज अत्तराचा परिमळ दरवळत नाही", याचा काय अर्थ काढायचा ? स्त्रीला अत्तराची उपमा दिलीये की तिला नासवल्याखेरीज मजा येणार नाही हे सांगितलय? वेदनांकित सुख खरच असातं कि हेही मनावर ठसवल गेलय? बरयाच स्त्रिया खाजगीत मान्य करतात कि संभोग हा वेदनादायीच असतो आणि पुरुष मानतात कि जेवढ्या वेदना जास्त तेवढी 'मर्दानगी' जास्त. अनादी काळापासुन हेच चालत आल आणि राहीलही. पण मग सुख कुठे गेलं आणि ते कसं मिळेल हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

एक तर आपल्याकडे हा विषय वर्ज्य. कोणी बोलत पण नाही. कोणालाच हा प्रश्न पडत नाही का? कि आपली मानसिकताच अशी झालिये कि प्रवास वेदनेतून सुखाकडे जातो असं मानलं जातं?
 मी अमुक एवढ्या मुलींचे गर्भपात करवले यावर कसं कोणाचं पौरुष सिद्ध होऊ शकतं? काही जोडपी एवढी निष्णात असतात कि दिवस मोजून आणि वजाबाक्या करुन कार्यभाग सिद्ध करतात आणि वर कसं manage केलं यावर टाळ्या घेतात. यात कौतुकास्पद काय आहे? कोणी काय करावं हे मी ठरवू इच्छित नाही तरि एकाची वेदना दुसरयाचं सुख कसं असू शकते?

मानवी शरिराच्या गरजांचं प्रमाण व्यस्त असू शकतं आणि असेलही. पण हा काही उपाय ठरू शकत नाही. गरज नाकारण ही उपाय नाही. लीव  इन  रिलेशनशीपला माझा पाठिंबा आहे पण विवाहबाह्य संबंधांना नाही. कारण मानलं तर आहे फरक आणि मानलं तर नाही. मी मानतो फरक. आज कायदा आहे लीव  इन  रिलेशनशीप साठी आणि विवाहबाह्य संबंधांसाठी नाही यातंच सारं काही आलं.

लीव  इन  रिलेशनशीपची चर्चा झाली आणि विवाहबाह्य संबंधांची नाही झाली. विवाहबाह्य संबंध अनादी काळापासुन आहेत फक्त चर्चा झाली नाहिये. उदाहरणार्थ , राजा राणीला मूल होत नाहिये, ‍मुनीचा आशिर्वाद घेतला, झालं मूल. मूल काही आकाशातून तर नाही ना पडलं? पुरुष आणि स्त्रीचा संबंध आल्याशिवाय जीव जन्माला येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. [आपण समजू TEST TUBE BABY तेव्हाचा शोध होता जो कालचक्रात आपल्याकडून हरवला. उदा. कौरव] पण कुंती आणि माद्रीचं काय? पंडुराजाने पंडुरोगात पौरुष गमावलेलं, मग पांडव त्याचे पुत्र कसे? बाप असणं आणि नाव देणं यातही फरक असेलंच कि. कर्ण कुंती आणि सूर्याचा अनौरस पुत्र म्हणून का गणला गेला? हे विवाहबाह्य संबंध नव्हते ?

खूप पूर्वी इजिप्त आणि रोमन राज्यामध्येही एक प्रथा होती. राजा जर पुरुष नसेल तर राणी सबंध राज्यातील कुठल्याही पुरुषाकडून हे सुख प्राप्त करुन राज्याला वारस देऊ शकते.
अमिताभ आणि सैफ अली खानच्या 'एकलव्य' चित्रपटाचा हाच विषय होता.


आता लीव  इन  रिलेशनशीप कडे वळतो. हे ही नवीन नाहीये आपल्याला. जे नक्षलवादी किंवा लाल (communist) चळवळीत होते किंवा ज्यांनी त्याबद्दल वाचलय त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते. एकाच ध्येयाने प्रेरित होउन एकाच दिशेने वाटचाल करणारया त्या माणसांना नव्हत्या का शारिरीक गरजा? ज्यांनी (लग्न न करता) एकत्र राहून त्या मिळवल्या किंवा भागवल्या ते आपल्या लीव  इन  रिलेशनशीपचे आद्य उपासक आणि प्रचारकच आहेत.

लीव  इन  रिलेशनशीप आणि विवाहबाह्य संबंधांमध्ये एक मूलभूत फरक आहे. लीव  इन  रिलेशनशीप मध्ये स्वातंत्र्य आहे(मानलं तर).  विवाहबाह्य संबंधांमध्ये सुरुवात होते ती गरज म्हणून आणि शेवट होतो तो वापरुन घेतल्याच्या जाणिवेत, (स्त्री आणि पुरुष दोहोंसाठी). आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरिल अत्याचारांनानेहमीच झुकते माप दिले जाते तरिही पुरूषांसाठी तो नेहमीच तोंड दाबून बुक्कयांचा मार ठरतो. (ठरू शकतो)
   कळावे,                                                                                                                                प्राक्तन पाटील