Monday, 17 October 2011

दुर्योधन

महाभारताचा खलनायक म्हणून आपण याला ओळखतो. पण याच खलनायकाच अनुकरण आजवर होत आल आणि जे जिंकले ते जेते ठरले आणि जे हरले ते नष्ट झाले. तरिही आपण त्याला खलनायक म्हणूनच ओळखतो.

त्याची दुसरी बाजू का मांडली गेली नाही आणि त्यावर चर्चाचर्वण का झालं नाही ?

तो हस्तिनापूर महाराज्याचा राजपुत्र होता. जेष्ठ व श्रेष्ठ कौरव होता. का असू नये अभिमान ? का असू नये गर्व ? राजा अंध असूनही राज्याचा उत्कर्ष होत होता आणि त्याचं श्रेय निर्विवाद दुर्योधनाला जातं. कारण तो प्रचंड महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी होता.
पांडवाच्या इंद्रप्रस्थात, मयसभेत फजिती झाल्यावर स्वाभिमान ( अहंकार नाही ) डिचवला जाणं सहज होतं. याज्ञसेनीचं हास्य आणि शब्द विखारी होते.
" अंधुपत्र दुर्योधन पण आंधळे आहेत हे ठाऊक नव्हतं. "
दुर्योधनाचं मन पेटून उठलं," तात या शब्दाचा अर्थ कळतो का याज्ञसेनीला ? माझ्या तातांच्या व्यंगावर भाष्य करण्याएवढी ती सूज्ञ आहे का? "
{ याज्ञसेनीचा जन्म यज्ञकुंडातून झाला होता आणि द्रुपद तिचा biological पिता नव्हता. }
याज्ञसेनीचं हास्य आणि शब्द सर्वस्वी पूर्वग्रह दूषित आणि चूकीचे होते.

पुढे पांडव द्यूतात हरून वनवासात गेल्यावर दुर्योधनाने हस्तिनापूरात युद्धसामग्रीच्या कार्यशाळा उभारण्यामागे केवढा दूरदर्शीपणा होता. त्याला सदैव हे ठाऊक होतं की पांडव परत आल्यावर सत्तासंघर्ष अटळ आहे. कारण एकाच राज्याचे दोन राजे असूच शकत नाहीत. तसं झाल तर राज्याच विघटन होत जातं. राजा आणि मांडलिक हे समिकरण त्याला मान्य नव्हतं. त्याला पुरेपूर ठाऊक होत की एक जेता असतो आणि बाकीचे जितं असतात. जर त्याच्यासारख्या राजपुत्राने जेता होण्याचं स्वप्न नाही पाहायच तर कोणी पाहायच ?
" माझ्या तातांच्या राज्यावर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सर्वस्वी माझाच हक्क आहे. कौरवांच अन्न खाऊन पांडवांचे गुणगान गाणारया या भाटांना काय कळणार या दुर्योधनाची व्यथा आणि वेदना ? "

त्याला खूपच कमी पाठराखे मिळाले. कर्ण, अश्वत्थामा आणि दु:शासन. कर्णावर तर भावाहून अधिक माया आणि विश्वास.
" पांडव अज्ञातवासातून परतल्यावर शिष्टाई करायला कृष्ण आला होता. मी माझ्या राज्याचे तुकडे सहनच करू शकत नव्हतो. मी युद्धाचा पर्याय निवडला. कृष्णाने मला सर्वविनाशकारी युद्धाची कल्पना दिली. पण मला कर्णावर पूर्ण विश्वास होता. आणि म्हणूनच आयुष्यातल सर्वात मोठं द्यूत मी खेळायच ठरवलं. "

" गुरूपुत्र अश्वत्थामा माझा सहकारी. माझ्या सुखदु:खात मोलाची साथ आणि सल्ला देणारा. माझं मन तिघांनाच कळलं. तात, कर्ण आणि अश्वत्थामा. माझ्या दुर्दैवी मृत्यूनंतरही पांडवांचा प्रतिशोध घेण्यासाठी त्यांच्या मुलांचा अंत करणारा. कृष्णाने त्याच्या भालप्रदेशातील मणी काढून घेतला. तो स्फटीक त्याच अस्तित्व होता. परिणामांना अज्ञ नसताना त्याने हे कृत्य केलं आणि तेही तो स्वत: अमर असताना. "

" दु:शासन माझी सावलीच होता. माझ्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्याने झेलला. अगदी द्यूतानंतर माझं नैतिक अध:पतन झाल्यावरही त्याने माझी आज्ञा मानून भर सभेत याज्ञसेनीची वस्त्र फेडली. त्यावर भीमाची प्रतिज्ञा ऐकूनही तो तसूभरही हलला नाही. पण माझ्या काळजाचा थरकाप उडाला होता. दु:शासनाच्या युद्धकौशल्याची चिंता नव्हती पण भीमाच्या अमानवी शक्तिची भीती होती. "



* द्रौपदीच्या वस्त्रहरणावरून झालेली टिका अनाठयी वाटते. कारण युद्धात जेथे कृष्णासारख्या नारायणाला कोप आवरला नाही आणि त्याने कर्णावर रथचक्र उगारलं, तेथे दुर्योधन तर साधारण नर होता. आणि त्याचा कोप का अनाठायी असावा?

No comments:

Post a Comment