हा शेरखान जंजीर मधला प्राण नाही, हा शेरखान मोगली मधला. नाना पाटेकर ने आवाज दिलेला. तर, शेरखान एक वादग्रस्त तरी उदात्त व्यक्तिमत्व. (निदान माझ्यासाठी तरी)
नावात काय आहे अस Shakespear कधी तरी म्हणाला होता पण नकोच. माझे मित्र त्याला शेरखान म्हणतात. आता, हा शेरखान म्हणजे area चा दादा. याला डरकाळी फोडायची गरज नाही कारण डोळ्यातल्या जाळाने माणूस खाक होईल इतकी तीव्रता! याला ओळखत नाही असं माणूस मला अजून भेटायचंय. याचे उमेदीचे दिवस बघायला मी जन्मलो नव्हतो (माझ्या नशिबाने!).
दृश्य स्वरूप - कधी काळी व्यायामाने पोसलेला देह, माथ्यावर तुरळक केस, उरलेले मागे वळवलेले, बोकड दाढी, shirt pant आणि हो एक 1st class Bullet. shirt नसेल तर अंगभर त्वचा सदृश tattoos. दंडाची बेटकुळी आता लटकली असली तरी त्यातली ताकद मी २६ जुलै च्या पुरात पाहिली होती. रिक्षावाला रिक्षासकट वाहून जात असताना या पठ्ठ्याने ती पकडली होती. अरे काय तो पुराचा पाशवी वेग आणि एक मर्त्य मानव त्याला आव्हान देतो? हो. दिलं होतं. आणि त्याच मर्त्य मानवाने एकाचे प्राण वाचवले होते. त्या दंडाची बेटकुळी फुटण्याएवढी फुगली होती. माझ्यासारखे बघे बरेच होते पण आमची काय मजाल त्या पुरात घुसण्याची? त्यासाठी जीवावर उदार होण्याची गरज असते आणि माझ्यासारख्या पांढरपेशी माणसाला कुठून येणार ती?
या घटनेपर्यंत शेरखानकडे भीतीने पाहणारा मी नंतर पूर्ण आदराने बघायला लागलो. किती किस्से सांगू याचे अजून?
एक काळ होता याने आणि याच्या मित्रांनी राज्य केलाय मुंबईवर. हे तो नाही सांगत पण अशा गोष्टी लपतहि नाहीत. खून, सुपाऱ्या, खंडण्या काय काय नाही केलं? पण माणुसकी असलेला दादा. शिकला नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून लग्न नाही. भाच्या पुतण्यांवर माया ओततोय. पुर्वायुष्यातल्या कृत्यांमुळे जीव कोंड्तोय म्हणून दारू पितोय. ज्यांचे मुडदे पाडले त्यांच्या मुलांनी येऊन धक्का मारला तरी मरेल एवढी पितोय.
असं हा शेरखान जो जिवंतपणीच एक दंत कथा बनलाय, त्याला माझी हि आदरांजली .
No comments:
Post a Comment